A D H D नवा अनुभव

2022 या वर्षात मी इगतपुरी मध्ये पोदार इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करत होतो.
तिथे इयत्ता सहावी मध्ये रितेश हा विद्यार्थी शिकत होता. हा विद्यार्थी वर्गात मोठ्या प्रमाणात दंगामस्ती करायचा. त्याची सखी बहीण दोन वर्ष पुढे शिकत होती. दोघेही विद्यार्थी बुद्धिमान होते हे मला त्यांच्याकडे पाहून कळत होते. परंतु रितेश हा मात्र बुद्धीने चांगला असला तरी वर्गात लक्ष देऊ शकत नसे. एका जागेवर बसून स्थिर चित्ताने अभ्यास करणे हा गुण त्याच्यात बिलकुल आढळत नव्हता. शिक्षकांना साहजिकच हा विद्यार्थी फार प्रिय नव्हता. शिक्षक त्याला वेगवेगळ्या पद्धतीने समजावण्याचा प्रयत्न करायचे. मी या विद्यार्थ्याच्या पालकांना मनोविकार तज्ञ व्यक्तीला भेटण्याचे सुचवले. परंतु आपल्या मुलाला काही विकार असेल असे पालकांना वाटत नव्हते. पालकांनी डॉक्टरकडे न जाण्याचा निर्णय घेतला. यावर्षी मात्र अजूनही पाल्यात सुधारणा होत नाही हे लक्षात येऊन पालकांनी डॉक्टरकडे जाण्याचा निर्णय घेतला. मोठी मुलगी हुशार आणि चुनचुनित होती. तिने इंटरनेटवरून याविषयीची माहिती गोळा करून पालकांना हा विषय समजावून सांगितला. आपल्या मुलाला असणारा त्रास हा एक आजार आहे हे पालकांना सुरुवातीला पचत नव्हते. परंतु कालांतराने त्यांनी हे मान्य केले. हे मान्य केल्यानंतर मनोविकार तज्ञांची भेट घेतली तेव्हा आपल्या विद्यार्थ्याला पाल्याला एडीएचडी हा आजार असल्याचे त्यांना लक्षात आले. या आजारामध्ये औषधे घ्यावी लागतात हे डॉक्टरांनी त्यांना समजावून सांगितले. औषध उपचाराने या विद्यार्थ्याचे लक्ष न लागण्याचे प्रमाण कमी झाले. अभ्यासावर लक्ष लागायला लागल्यामुळे तो योग्य पद्धतीने शिकू लागला. या मोठ्या बहिणी बद्दल मला खूप अभिमान वाटला की ईतका गंभीर विषय तिने समजून घेतला. व पालकांना देखील समजावून सांगितला. 
आधुनिक वैद्यक अत्यंत प्रगत आहे असे मला वाटते. अनेक शास्त्रज्ञांनी प्रचंड मेहनतीने शोधलेले औषधोपचार मानवी जीवनाचा आनंद वाढवत आहेत. पूर्वी लोक जंतू जन्य आजारांनी मरुन जात. आता प्रति जैविक क्रांती घडवत आहेत. लोकांचे आयुर्मान वाढले. तशीच मनोविकार तज्ञ आणि मानसशास्त्रज्ञ लोकांच्या जीवनातला आनंद वाढवत आहेत. 
जीवन सुखकर करत आहेत. 

मुले लहान असतात त्यामुळे स्वतःसाठीचे अनेक निर्णय घेऊ शकत नाहीत. अशा वेळेस त्यांना जाणवणारे त्रास समजून घेण्यासाठी पालक आणि शिक्षकांची जबाबदारी मोठी ठरते. शिक्षकांनी अथवा पालकांनी एडीएचडी सारख्या आजारांचे स्वरूप समजून घेतले तर खरंच अनेक विद्यार्थ्यांच्या आयुष्यात आनंद फुलेल.

या आजाराची काही लक्षणे रेफरन्स म्हणून देत आहे.


पालकांना या मेंदूच्या अवस्थेची लक्षणे ओळखणे कठीण होते. अशा वेळी बालमानसशास्त्र तज्ज्ञांची मदत घेतल्याने याची लक्षणे ओळखणे सोपे होते.

लक्षणे पुढीलप्रमाणे 
१. एकाग्रता नसणे (Lack of attention)

२. खूप जास्त क्रियाशील असणे (Hyperactivity)

३. आवेशाने वागणे (Impulsive)

१. एकाग्रता नसणे (Lack of attention)- या प्रकारात व्यक्ती एकाग्रता ठेऊन काम करू शकत नाही. कोणत्याही एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. सतत जागा बदलत राहणे, करत असलेली कृती बदलत राहणे असे प्रकार होतात. कोणी जर काही सूचना देत असेल तर ते ऐकून न घेणे, आपल्याच तंद्रीत असणे, सतत वस्तू विसरणे. एखादी कृती पूर्ण न करता दुसरी कृती करणे, एखादे काम करायला घेतले तर मध्येच ते विसरून जाणे. सूचना विसरणे, निरोप पोहोचवता न येणे. सर्वजण एक गोष्ट करत असतील तर त्यात सहभागी न होता आपले वेगळे काम सुरु करणे. कोणतीही भाषणे, बोलणे जास्त वेळ न ऐकू शकणे अशी लक्षणे सामन्यत आढळून येतात.


२. खूप जास्त क्रियाशील असणे (Hyperactivity)- एखादे काम खूप ऊर्जा वापरून करणे. लहान मुले मुख्यतः यात एका जागी अजिबात बसत नाहीत. उंच जागेवर चढून उड्या मारणे, बसल्या जागी देखील सतत चुळबुळ करणे, वस्तू उचलायला धावणे, आजूबाजूच्या जड वस्तू हलविण्याचा प्रयत्न करणे, बैठे खेळ खेळण्यास फारसा रस नसणे. ज्या गोष्टी करण्यात जास्त शारीरिक ऊर्जा लागते त्या गोष्टी सतत करणे अशा गोष्टी लहान मुले करताना दिसतात.


३ . आवेशाने वागणे (Impulsive) - म्हणजे कोणतीही कृती ही आवेगाने करणे. अशा कृतींमध्ये परिणामांची चिंता केली जात नाही. म्हणजे लहान मुलांना अनेकदा पळताना, सायकल चालविताना पडण्याचे भान राहत नाही इतक्या आवेगाने ते एखादी कृती करतात. यामध्ये समोरून येणारा धोका जाणून घेण्याची क्षमता देखील मुलांमध्ये नसते.
आपल्यामुळे दुसऱ्या कोणाला इजा होऊ शकते याचे देखील भान मुलांमध्ये राहत नाही. बोलतानाही अति प्रमाणात बडबड करणे, समोरच्या व्यक्ती बोलत असताना त्यांना मध्येच थांबवून आपण बोलणे, मोठ्याने आवेगाने बोलणे, कधी कधी चिडून एखादी कृती करणे असे प्रकार लहान मुलांमध्ये दिसतात.


टीप:- हा लेख लिहिल्याचे मला कोणतेही पैसे अथवा फायदा औषध कंपनी अथवा डॉक्टर कडून मिळालेले नाहीत. 


Comments

Popular posts from this blog

Jumping to Conclusions

About me.

मदतीचे सोपे नुस्खे