मेंटल फिल्टर
मेंटल फिल्टरिंग हा वैचारिक गफलतीचा एक प्रकार आहे. मी स्वतः या विचार चुकीचा शिकार झालोय. मेंटल फिल्टर हा फार गमतीशीर प्रकार आहे.
आपण लहानपणी अशी म्हण ऐकायचो की, ज्याला कावीळ झाली आहे त्याला जग पिवळं दिसणार. ही गोष्ट शत प्रतिशत खरी आहे. आपण ज्यावर विश्वास ठेवतो तश्या प्रकारे आपण मनात प्रतिमा तयार करून घेतो. आणि खरं वास्तव तपासण्याची तसदी घेत नाही. वास्तवापासून दूर अनेक विचार आपल्या मनात नाचतात. जसं की, समोरच्या व्यक्तीने मला तू आज छान दिसतेस असं म्हंटले की, आपण असा विचार करतो की, मला चांगलं वाटावं म्हणून म्हणत असणार किंवा माझ्या कडून काही हवे असेल. पण अनेकदा आपण छान दिसतोय यावर आपण विश्वास ठेवत नाही. आपल्याला असा सकारात्मक प्रतिसाद मिळाला की तो स्वीकारण्याचा निर्णय आपण जाणीवपूर्वक घ्यायला हवा.
आपण नेमके उलट करतो. सकारात्मक गोष्टी स्वीकारत नाही आणि नकारात्मक मात्र स्वीकारतो. कोणी आपल्यासोबत वाद केले तर आपण ते अगदी उत्तम लक्षात ठेवतो. आणि त्यावर धुस्फुसत राहतो आणि तोच मूड कॅरी करत राहतो.
नेमके याच्या उलट फिल्टर्स आपण वापरायला हवे.
मूड खराब करणाऱ्या घटना घडल्या तर शांत बसून त्यातले आपल्याला वाटणारे नकारात्मक मुद्दे काळजीपूर्वक खोडून काढले पाहिजेत. लहान सहान नकार जीवनाचा अविभाज्य भाग असतात ते स्वीकारावे लागतात. काही वेळेस संघर्ष करणे भाग असते. पण हा संघर्ष करताना तो तोंड लटकवून करता येऊ शकतो किंवा प्रसन्न राहून देखील करता येऊ शकतो.
आपण परिस्थितीतून सकारात्मक शोधून काढायचं ठरवलं तर काहीतरी सापडतं एवढं नक्की. आपण किती कल्पकता वापरून शोधतो हे महत्त्वाचं. त्यासाठी चांगले पॉजिटीव्ह फिल्टर्स आपण परिस्थितीला लावून पाहिले की मग धीर येतो. उमेद निर्माण होते. बळ येतं. वास्तवाकडे दुर्लक्ष न करता असे खूपसे फिल्टर्स आपल्याला आपल्या जीवनाला लावून पाहता येतात आणि त्याची ताकद लक्षात आली की अजून आत्मपरीक्षण करायला उर्मी येते.
सकारात्मक फिल्टर्स वापरुया. नकारात्मक टाकून देऊया.
Comments
Post a Comment