धर्म आणि संस्कृती
विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते असे एक वाक्य अनेकदा आपल्या माथ्यावर मारले जाते. असे काहीसे सध्या सरसंघ चालक बोलले आहेत. वस्तुस्थितीत विज्ञान आपल्याला काय कळत नाही हे नम्रपणे मान्य करते. धर्माचे ठेकेदार मात्र आपल्याला जे कळत नाही ते आपल्याला कळत नाही असे मान्य करत नाही. परंतु विज्ञानवादी मात्र नकळतपणे काही चुका करतात.
विज्ञानवादी धर्माच्या ठेकेदारांना धर्मापासून वेगळे करीत नाहीत हे सध्याचे दुर्दैव आहे. धर्म म्हणजे नैतिकतेने वागणे, इतरांशी प्रेमाने वागणे असा अर्थ सामान्य माणसाला धर्मातून अपेक्षित असतो. अध्यात्म म्हणजे आत्म अध्ययन करणे म्हणजे स्वतःला अभ्यासणे असा अर्थ केल्यास धर्म आपल्याला टाकाऊ वाटणार नाही आणि अध्यात्म हे देखील टाकाऊ वाटणार नाही. विज्ञानाने माणसाचे प्रश्न सोडवले तसे धर्माने सोडवले नाहीत हे आताशा शाळकरी पोरांना सुद्धा समजते. समजत नसेल तर ते आपले दुर्दैव. कोरोना काळात सरकारने रुग्णालय वाढवत मंदिरे मात्र बंद ठेवले ठेवली यातून जनतेला विज्ञानाची ताकद समजणे इतकी जनता शहाणी आहे.
आपण शाब्दिक तलवारी काढून अध्यात्मावर सपासप चालवल्यामुळे देव, धर्म, अध्यात्म मानणारे अनेक सामान्य लोक आपल्यापासून तुटून पडतात हे गेल्या दोन-चार वर्षापासून मला जाणवते. माणसाला शेपटीचा उपयोग नसल्यामुळे शेपूट जशी गळून पडली तसा धर्माचा उपयोग नसल्यामुळे धर्मदेखील हळूहळू गळून पडेल असा मला विश्वास आहे.
लोक आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या अनिश्चिततेला घाबरून आपल आयुष्य अधिकाधिक स्थिर करण्याच्या प्रयत्नात असतात. आयुष्य स्थिर करण्याचा प्रयत्नामुळे माणसाचे आयुष्य अधिक चांगले होते हे माणसाला अनुभवाने समजले आहे. ती गरज अध्यात्मातून पूर्ण होत असते. समाजाची कोणतीच गरज पूर्ण न करणाऱ्या एखाद्या तत्वास समाज डोक्यावर उचलून घेत नाही. तेव्हा अध्यात्माला पूर्णपणे मोडीत काढणाऱ्या विज्ञानवाद्यांनी हे लक्षात घ्यायला हवे.
भांडवलशाहीत सेवा पुरवठादार चांगली सेवा पुरवत नसेल तर त्याचा व्यवसाय बंद पडतो. हा नियम अध्यात्मस लावून बघितला तर आपल्या लक्षात येईल की लोकांच्या चिंता कमी करण्याची गरज अध्यात्माकडून पुरेपूर भागवली जाते. जो जो माणूस देवाकडे काही मागण्यासाठी जातो तेव्हा ती गोष्ट मिळणार नसेल तरी कठीण प्रसंगासाठी गरजेचे असलेले धैर्य त्याला अध्यात्मातून मिळत असते.
जेव्हा बुवा व बाबा लोकांच्या आत्ताच्या आयुष्यातल्या बदलांवर भाष्य करतात व लोकांना त्यातून आयडेंटिफिकेशन मिळते तेव्हा लोकांचा बुवांवर विश्वास बसतो. व ते बुवा बाबा यशस्वी होतात. जे चांगली उदाहरणे देऊन करमणूक करतात त्यांना अधिक भक्तगण लाभतात. बाबा लोक प्रत्यक्ष पैसे न घेता खूप जणांशी आयुष्यावर जनरल जे काही बोलतात. त्यातून समाजातल्या भाबड्या लोकांचे मन सावरण्याचे महत्त्वाचे कार्य होते. मन सावरल्यानंतर मूळ समस्येच्या व्यावहारिक बाजूकडे लक्ष द्यायला हवे होते हे सांगण्याचे बाबांना काही पैसे मिळत नाहीत व लोक देखील त्याकडे फार लक्ष देत नाही. कित्येकदा तर भावनिक बाजूची काळजी घेतल्यानंतर व्यावहारिक समस्या सोडवण्याची ताकद लोकांना आपोआप मिळते. आपोआप मिळते म्हणजे जादू होऊन नव्हे, तर मेंदूला समस्या सोडवण्यासाठी जो वेळ मिळतो त्यातून मेंदू ती समस्या स्वतः हून सोडवतो.
मूळ वाक्य विज्ञान संपते तेथे अध्यात्म सुरू होते हे पूर्णपणे भंपक आहे. त्याच्यासोबत अध्यात्म सुरूच होत नाही असं म्हणणेसुद्धा भंपकपणा आहे. धर्म आणि अध्यात्म या मानवी मनाच्या गरजा आहेत त्याचा सार्वत्रिक परिचय आपणास पावलोपावली येतो. धर्म आणि अध्यात्म याची कालसुसंगत तर्ककठोर चिकित्सा करणे हे अध्यात्म नाकारण्यापेक्षा अधिक योग्य ठरते.
#लिहिण्याची_हुक्की
Comments
Post a Comment