कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

आपण विचार करताना अनेकदा काही वैचारिक चुका करत असतो. याला मानसोपचाराच्या भाषेत कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन असे म्हणतात. 

उदाहरणार्थ ओवरजनरलायझेशन म्हणजे अतिसमावेशीकरण :- 

मानवी मन कसे काम करते हे लक्षात घेतले तर अति समावेशकता आपल्याला लगेच समजेल. माणसाचे मन अनेक ठिकाणी पॅटर्न पाहण्याचा प्रयत्न करत असते.
एखाद्या घटनेतून किंवा अनुभवातून आपण जीवनाबद्दल एकंदरीत निष्कर्ष काढायला जातो.  या वैचारीक गफलती समजून घेणे गरजेचे आहे. एका उदहरणातून समजून घेऊ.

अनेक लोकांना असे वाटते की, ग्रामीण भाषा  वापरणारा माणूस कमी बुद्धीचा असतो. अथवा कमी शिकलेला प्रत्येक माणूस कमी बुद्धीचा असतो. 
खरे तर आपण आपल्या आजूबाजूला अनेक ग्रामीण माणसं उच्च पदांवर काम करताना पाहिलेली असतात अथवा अनेक कमी शिकलेली माणसे उत्तम व्यवसाय करताना पाहिलेली असतात. आणि हे दोन्ही आपल्याला अनेकदा पुरावे देत असतात परंतु परिस्थितीचा काही एक पैलू आपण दुर्लक्षित करत राहतो. आपल्या नकळत स्वीकारलेल्या दृष्टिकोनामुळे परिस्थितीचा हा पैलू आपल्याला पाहता येत नाही. 
आपले अनुभव हे व्यक्तीनिष्ठ असतात ते एखाद्या व्यक्तीला पाहून आलेले असतात.पण आपले निष्कर्ष मात्र आपण संपूर्ण जगाला लावायला जातो. याला आपण अति व्यापकीकरण अथवा अतिसमावेशीकरण म्हणावे. 

समजा की सारा तिच्या गणिताच्या परीक्षेत अपयशी ठरते आणि ती विचार करते की "मी गणितात अत्यंत वाईट आहे आणि मी कधीच गणित शिकू शकणार नाही." 
तेव्हा सारानी एकाच घटनेवर आधारित एक सर्वकालिक व्यापक निष्कर्ष काढला की मला कधीच गणित जमणार नाही. मी कधीच गणित शिकू शकणार नाही. 

वास्तविक गणित हा प्रयत्नाने जमणारा विषय आहे, हे आपण सर्व लोकं जाणतोच. त्यामुळे साराचा निष्कर्ष चुकीचा आहे आणि त्या निष्कर्षामुळे तिच्या आयुष्यात गणित विषयात तिची पीछेहाट होऊ शकते. म्हणून असा सार्वकालिक व्यापक निष्कर्ष काढणे योग्य नाही. 


प्रकाशला कुत्र्याचा वाईट अनुभव आहे आणि तो असा विचार करतो, की सर्व कुत्रे हे धोकादायक असतात.  ते चावतात आणि म्हणून त्यांच्या समोरून जाणे टाळलं पाहिजे. प्रकाशच्या अंगावर कधीतरी कुत्रा धावून  आल्यामुळे त्या एका घटनेवर आधारित अतार्कीक भीती त्याने मनामध्ये निर्माण केलेली आहे. 
प्रकाश अनुभव पूर्णपणे मान्य करून देखील आपण असा निष्कर्ष काढू शकत नाही की सर्व कुत्रे धोकादायक असतात व कुत्र्यांसमोरून जाऊ देखील नये. साहजिकच अनोळखी ठिकाणी कुत्र्यांसमोरून जाताना आपण सावध रहावे हे गरजेचे आहे. परंतु अतार्किक भीती निर्माण करून घेतल्यास त्यामुळे अनेक कामे रखडणार हे उघड आहे. 

तेव्हा अशा वैचारिक गफलती टाळणे आपल्या मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. 

Comments

Popular posts from this blog

Jumping to Conclusions

About me.

मदतीचे सोपे नुस्खे