इमोशनल रिजनिंग
इमोशनल रिजनिंग ही अशी मानसिक प्रक्रिया आहे की त्यात व्यक्तीला असे वाटते की, मला माझ्या भावनांत जे काही जाणवते ते म्हणजे खरे..अश्या चुकीच्या भावनांतला आशय सत्य मानण्याच्या प्रक्रियेमुळे माणसांमध्ये चिंता, अतिरिक्त भीती, स्ट्रेस (तणाव) या भावना निर्माण होतात. आधीच असणारी चिंतेची स्थिती चुकीच्या वैचरिक्तेने अधिक गडद होते.
उदाहरणार्थ एखाद्या स्त्रीला तिचा नवरा कितीही म्हणू देत की, मी तुझ्याशी एकनिष्ठ आहे परंतु त्या स्त्रीस मात्र असे वाटत राहते कि ज्या अर्थी तिला मत्सर भावना आहेत त्या अर्थी त्या असल्यामुळे तिचा नवरा तिच्याशी एकनिष्ठ नसणार. या विचारांतल्या गड्बडीस इमोशनल रिजनिंग असे म्हणतात. असे चुकीचे रिजनिंग ओळखून त्यात योग्य ते बदल केल्यास नैराश्य, चिंता या सारख्या आजारात मोठ्या प्रमाणात चांगला फरक पडतो. पण तितके अनेकदा पुरेसे ठरत नाही हे देखील नोंदवणे आवश्यक आहे.
मी इंजिनिअरिंग करत असताना मला काही विषय अत्यंत अवघड वाटायचे आणि त्यामुळे मी हे विषय बोरीग आहेत असे लेबल लावून मोकळा व्हायचो यास लेबलिंग असे म्हंटले जाते. पूर्वग्रह ठेवून एखाद्या समस्येकडे पाहत राहिल्यास नेमके आकलन होत नाही. यामुळे आपली चिंता वाढीला लागू शकते.
मला आयुष्यात नंतर असे समजले की हे विषय फारच रसाळ आहेत आणि ते समजून घेण्याचे अनेक फायदे आहेत. पण ज्या अर्थी मला हे विषय अवघड वाटत आहेत, त्या अर्थी हे विषय रटाळ असणार म्हणून मी अभ्यासापासून पळ काढला. या चिंतेच्या भावनेस व लेबलिंग करण्याला मी ओळखू शकलो असतो व हे विषय रटाळ वाटत आहेत कारण आपल्याला ते अवघड वाटत आहेत. त्या विषयांची उपयुक्तता जाणून घेता ते अभ्यासणे आवश्यक आहे व म्हणून अधिक सोयीचा व्यावहारिक मार्ग शोधला पाहिजे. अशी तार्किक भूमिका घेणे मला उपयुक्त ठरले असते.
वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, हे मला अनेक वर्षांनंतर समजले.
जसे विषयांचे होते तसेच माणसांचे होते. आपण आपल्या नातेसंबंधात समोरच्या व्यक्तीच्या बोलण्याचा अर्थ चुकीचा घेतो अथवा आपल्या भावनांना चुकीचे जैविक वळण लागलेले असते, त्यास बदलण्याचा पुरेसा प्रयत्न आपण करत नाही. तेव्हा आपले निष्कर्ष आणि वस्तुस्थितीच्या वेगवेगळ्या शक्यता तपासून पाहिल्या पाहिजेत. व आपल्या भावनाना वाटेल ते खरे न मानता वस्तुनिष्ठ पुराव्याची तपासणी करावयास हवी.
आपण आपल्या भावनांना असे विवेकी वळण लावणारे विचार जाणीवपूर्वक स्वतःत रुजवू शकलो तर ते आपणास उपयुक्त ठरतील यात शंका नाही. स्वतःच्या विचारांचे व भावनांचे तर्कशुद्ध विश्लेषण करायला हवे हे लक्षात आले आणि ते योग्य रित्या आपण करू शकलो तर , आपल्या अनेक व्यावहारिक समस्यांत आपण नकळत केलेला भावनिक गुंता आपल्या लक्षात येतो. आणि आपल्याला व्यावहारिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणे सोपे जाते.
विवेकनिष्ठ मानसोपचारातले काही वाचलेले, काही सुचलेले
असंच_काहीसं_रँडम
Comments
Post a Comment