Attention Deficit Disorder
यशची आई पालक सभेला गेली होती तेव्हा त्याच्या वर्गशिक्षिका असं म्हणाल्या की, "अहो तुमचा यश ना हुशार आहे, पण त्याचं वर्गात बर्याचदा लक्षच नसतं...
मी काय शिकवते आहे,अभ्यासात कुठला भाग चालू आहे हे सांगणं त्याला अनेकदा जमत नाही...वाक्य तर सोडा..पराग्राफ कुठला सुरू आहे हे सुद्धा त्याला अनेकदा समजत नाही..
काही वेळा तो उत्तरे बरोबर देतो, अगदी बरोबर उत्तरे देतो पण अनेकदा चुकीची भलतीच काहीतरी उत्तरे देतो, त्याच्या अभ्यासात सातत्य नाहीये..त्याचं अभ्यासात लक्ष नाहीये.."
यावर यशची आई म्हणाली, "मॅडम आम्हाला पण असं नेहमी वाटतं की, यश हुशार आहे पण म्हणावी इतकी मेहनत तो घेत नाही..
त्याला कष्ट करण्याचा बर्यापैकी आळस आहे...सोबतच त्याची चिडचिड अलीकडे वाढली आहे.
साधारणतः मागच्या वर्षी आणि यावर्षी तर त्याचा अभ्यासातला आधीचा रस सुद्धा कमी होतोय असं आम्हाला जाणवतंय..."
त्याला दुजोरा देत मॅडमनी एक वाक्य म्हंटलं...
"यश अभ्यासात लहान सहान चुका करतो. म्हणजे एखाद्या प्रश्नाचे उत्तर फार सोपं असतं, परंतु याच्याकडून अगदी सिली मिस्टेक होतात..अवघड प्रश्नाची उत्तरे अनेकदा सफाईदार पणे देतो. त्याची बुद्धिमत्ता चांगली आहे.पण काहीतरी गडबड आहे असं जाणवतंय.
तुम्ही रागावणार नसाल तर एक सांगते यशला तुम्ही एकदा मानसशास्त्रज्ञांकडे घेऊन जा."
त्याबरोबर यशच्या आईला अवघडल्यासारखं झालं,
कुठेतरी मनात आपल्या मुलाला काही गंभीर आजार असेल का याची भीती वाटली. मिश्र भावनांची वादळे तिच्या मनात घोंगवली. यशची आई म्हणाली की, मॅडम नको हो ईतक्यात जायला मानसशास्त्रज्ञाकडे.इतकाही गंभीर नाही वाटत हा मुद्दा. होईल त्याच्यामध्ये सुधारणा.. असं मला वाटतं आणि मानसशास्त्रज्ञांकडे जावं लागेल असं त्याच्या बाबांना सांगितलं तर त्यांच्या डोक्याला अजून एक ताप सुरू होईल..
अहो आधीच कोविडनंतर व्यवसायातल्या अडचणीमुळे त्यांची चिडचिड सुरू असते."
मॅडमनी मानसशास्त्रीय मदतीचं महत्व पटवत थोडासा आग्रह धरल्यानंतर यशची आई त्याला मानसशास्त्रज्ञाकडे दाखवायला तयार झाली...
फोनवर अपॉइंटमेंट घेऊन स्वारी निघाली...
मानसशस्त्रज्ञ म्हणजे काहीतरी गंभीर प्रकरण असावं म्हणून दबकत दबकत दोघे आत शिरले.
पण त्यांनी अगदी प्रेमाने स्मितहास्य करत दोघांना आत बोलावलं तसे दोघेही शांत झाले..
मानसशास्त्रज्ञांनी हळूहळू यशला काही प्रश्न विचारले, यशच्या आईला काही प्रश्न विचारले.त्यानंतर यशच्या अभ्यासाबाबत सखोल चौकशी केली आणि त्या दरम्यान यशमध्ये अभ्यासात लक्ष न लागण्याचे प्रमाण बरेच आहे असे त्यांच्या लक्षात आले...
त्यांनी यशला अटेन्शन डेफिसिट ऑर्डर म्हणजे अभ्यासात अथवा वर्तमान काळात करत असलेल्या कृतीमध्ये लक्ष न लागण्याचा आजार असल्याची शक्यता नोंदवली. तरीही लगेच घाबरून जाऊ नका असेही सुचवले.
यशच्या आईला थोडी भीतीच वाटली एकंदरीत या प्रकाराची...
तेव्हा त्याच्या आईला आजाराच्या लक्षणाचे नेमके स्वरूप समजवण्याकरिता मानसशास्त्रज्ञानी दिलेले उत्तर असे की,
आपल्या मेंदूमध्ये अनेकविध भाग असतात ज्यांचे वेगवेगळे कार्य असते... आपले गेल्या शंभर एक वर्षातील कार्य अधिकाधिक बौद्धिक होत गेलेले आहे. त्यामुळे अभ्यासातील प्रगतीला अधिकाधिक महत्त्व प्राप्त होत गेले. आणि ही अभ्यासातील प्रगती हे मेंदूच्या अगदी पुढच्या भागात(फ्रंटल कॉरटेक्स) कसे कार्य चालते आहे यावर अवलंबून असते. या भागात डोपामाईन नावाचे मेंदूरसायन कमी पडले असता मुलांमध्ये वर्तमान काळात लक्ष न देऊ शकणे, दिवास्वप्नात रमणे, एकामागोमाग एक अशी जटिल समस्या सोडवण्यास सांगितल्यास त्यामध्ये अडचणी येणे, अभ्यासात किंवा ज्यात बरीच बौद्धिक ताकद लावावी लागते अशी कामं न जमणे, दिलेल्या कामात लहान लहान चुका करणे, अतिरिक्त आळस ही लक्षणे दिसतात...
यशला ही समस्या आहे...त्याची तीव्रता कमी आहे. पण दुर्लक्ष करण्याइतकी कमी नाही..याला आजार म्हणायचं की नाही हे तुम्ही ठरवा..
पुढे ते म्हणाले, आपल्या आजूबाजूच्या समाजात इतकी प्रगती झालेली नसती आणि इतकी बौद्धिक कामं आपण करत नसतो तर कदाचित यश अभ्यासात ईतका मागे पडत गेला नसता...कारण स्पर्धा तीव्र नसती.
आधुनिक जगात आपण प्रगतीचे नवनवे मापदंड रोज घालत असतो, रोज आपल्या मेंदूच्या ताकदीचा नवा आविष्कार घडवत असतो, त्यात काही लहानसहान समस्या असणारी अनेक मुले मागे पडतात...खरंतर यात काहीच हरकत नाही.. मुलं जशी आहेत तसं आपण स्वीकारायला हवं.. पण पालकांना हे मार्कंत मागे पडणं दुखावणारं असतं.. म्हणून ते नाराज होतात...ही स्पर्धा खरंतर इतकी तीव्र असण्याची काही गरज नाही.. आणि ती ईतकी तीव्र करण्यात मोठा वाटा पालकच उचलतात..
हे निदान ऐकून तुम्ही नाराज झालेल्या दिसताय...
पण मला विचाराल तर हा नाराज होण्याचा नव्हे, तर साजरा करण्याचा क्षण आहे..तुमचं मूल मागे का पडतंय याची नेमकी समस्या तुम्हाला लक्षात आलेली आहे. आता त्यावर नेमका उपाय करू शकणाऱ्या क्लुप्त्या आम्ही तुम्हाला सांगू तेव्हा त्या क्लुप्त्या तुम्ही वापरात आणू शकता. त्याच्या प्रगतीचं एक नवं दालन खुलं झालंय...
असं काही निदान होणं म्हणजे काही खूप खूप गंभीर बाब नव्हे.. लक्षणांचे स्वरूप समजून घ्यायला हवे ते महत्वाचं आहे.
मी तुम्हाला ही कल्पना देऊन ठेवतो की, या प्रकारच्या लक्षणांमध्ये अनेकदा मुलांना आम्ही मनोविकारतज्ञ डॉक्टरांकडे पाठवतो व मुलांना त्यांच्याकडून स्टीम्युलंट प्रकारातील औषधे दिली जातात. ही औषधे अगदी सेफ असतात. मी काही या औषधांची जाहिरात करत नाही. तसे काही पैसे देखील मला मिळत नाहीत. पण आवश्यक त्या ठिकाणी योग्य मात्रेत वापरल्यावर या औषधांनी मुलांच्या जीवनात अमुलाग्र बदल घडल्याचे मी पाहिले आहे. पूर्वीच्या काळी यशसारखी अनेक गुणी मुले अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून शाळा सोडून देत. आता या आधुनिक वैज्ञानिक उपचारांनी मुलांचा फायदा होतो, त्यांना अगदी उच्च शिक्षणापर्यंत झेप घेता येते हे लक्षात घेणं आवश्यक आहे..
एक लक्षात घ्या, की जिथे समुपदेशनाचा फायदा होतो तिथे सहसा औषधे वापरण्याचा आग्रह आम्ही धरत नाही. परंतु काही प्रकारांमध्ये औषधे वापरल्यास निकाल फार लवकर आणि चांगल्या प्रकारचे येतात. अटेंशन डेफिसिट डिसऑर्डर हा या प्रकारात मोडतो.
बाकी तुमच्याकडे गुगल वगैरे आहे. वेगवेगळ्या वेबसाईट्सवर या लक्षणांची माहिती दिली जाते. त्यातील वैज्ञानिक माहितीयुक्त स्रोत वाचले की तुम्हाला थोडं समाधान लाभेल.आजाराचे नेमके स्वरूप लक्षात येईल. तुम्ही पालक आपल्या मुलासाठी खूप जागरूक असता...पण खोट्या छद्मविज्ञान विषयापासून दूर राहा इतकच मी सांगेन. माहिती नेटवरून मिळवली म्हणून योग्यच असेल असे नाही ... तुम्ही घेतलेली माहिती उपचारक तज्ज्ञांशी चर्चा करून समजून घ्या. आणि हो, उपचार नेटवरून करू नका बरं ..
मगस
मग सर, त्याच्या अभ्यासाची काळजी करायला नको का ?? यशाच्या आईने चिंतीत मुद्रेने विचारले..
त्यावर सरांचं उत्तर आलं की, हो करा..जरूर करा...परंतु अतिकाळजी करू नका... नाहीतर तुम्हालाच चिंतेवरचे समुपदेशन सुरू करावे लागेल... या गमतीने दोघेही हसले...
थोड्या अजून गप्पा झाल्या आणि यशची आई आनंदाने सेशन संपवून बाहेर पडली..तिच्या मनातली मानसशस्त्रज्ञास भेटण्याची भीती गळून पडली..
अश्या हजारो मुलांना मानसोपचार फायद्याचे ठरतायत. दुर्लक्ष करून त्रास कमी होत नाहीत.
मानसिक त्रास अगदी सामान्य आहेत. तेव्हा मानसशास्त्रज्ञांकडे बिनधास्त भेट द्या.मनोविकारतज्ञ म्हणजे सायकियाट्रीस्ट हे पण 99 टक्के शहाण्यांचेच डॉक्टर असतात. तेव्हा त्यांनाही बिनधास्त भेटा...
नव्या युगातील आयुधांचा वापर करूया..
नव्या पिढीला नव्या जोमाने घडवूया...
योगेश फडतरे
मानसशास्त्रज्ञ
ठाणे
Comments
Post a Comment