आर. ई. बी. टी.
पुस्तकात अवघड वाटणाऱ्या अनेक गोष्टी खरेतर सोप्प्या असतात. सोप्प्या म्हणजे कमी महत्वाच्या नव्हे. आर. ई. बी. टी. बद्दल मला असे वाटत आलेले आहे. सामान्यातल्या सामान्य माणसाला पण समजावी असं एक फ्रेमवर्क या मानसोपचारशास्त्रात आहे.
आपल्या विचारांवर आपल्या भावना प्रामुख्याने अवलंबून असतात. आपण एखाद्या घटनेमुळे अस्वस्थ होतो त्यापेक्षा त्या घटनेचा आपण जो अर्थ लावतो त्यामुळे आपण अस्वस्थ होतो. प्रत्येक वेळी आपण लावलेल्या अर्थाचं विश्लेषण आपल्याला सापडेलच असं नाही. पण पुन्हा पुन्हा शोधत राहिले तर नक्की सापडेल.
उदाहरणार्थ एक सोपी गोष्ट घेऊयात. समोरच्या व्यक्तीने माझा फोन उचलला नाही याचं मी केलेलं विश्लेषण माझ्या भावना ठरवत असतं . मला जर असं वाटलं की, समोरची व्यक्ती मला टाळतेय तर मला त्रास होईल, राग येईल, वाईट वाटेल. वेगवेगळ्या भावना वेगवेगळ्या व्यक्तीत दाटून येतील. कोणाला असं वाटेल कि माझी किंमत समोरच्याला नाहीये म्हणून त्याने मला टाळलं असावं. कोणाला असं वाटेल की तो स्वतःला आता फार अतिशहाणा समजतो म्हणून माझा फोन उचलला नाही. या दोन्ही मूल्यमापनात फरक आहे. एकाच घटनेचं विश्लेषण दोन व्यक्ती वेगवेगळं करतात. कोणाला यात समोरच्याची चूक वाटते. आणि राग हि भावना डोकं वर काढते. तर कोणी स्वतः ला कमी लेखतं. स्वतःची किम्मत कमी झाल्या सारखं वाटतं आणि बिचारेपणाची भावना तयार होते. यापेक्षा वेगळा निष्कर्ष असाही असू शकतो कि त्या व्यक्तीचे काही महत्वाचे काम सुरु असल्याने फोन जवळ नसेल. तर एखाद्या वेळेस निसर्गाच्या हाकेला ओ देण्यास जावं लागलं असू शकेल.
खरतर निष्कर्षाप्रत न येता थोड्या वेळाने पुन्हा कॉल केल्यास हे निष्कर्षाचे फुगे निम्म्या वेळेस फुटतात. पण आपण घाईत चुकीचा विचार करून मोकळे होतो . आणि चुकीचे निष्कर्ष आपल्याला अस्वास्थ्यकारक भावनांपाशी पोहोचवतात.
समजून घेतले तर हे खूप ताकदवान आहे की, आपले विचार, ज्यात आपण स्वतःचे, इतरांचे , घटनेचे मूल्यमापन करतो ते आपल्यात भावना निर्माण करतात. आणि म्हणून विचारांचा मोठा प्रभाव आपल्या भावनांवर होत असतो.
लिहता लिहता लक्षात आले की माझ्या भाच्याला माझी किंमत नाही किंवा तो आळशी आहे म्हणून मला त्याने पाणी दिलं नाही, असे नसून तो त्याच्या अभ्यासात व्यस्त असल्यामुळे मला पाणी देऊ शकला नाही असं झालं असावं. म्हणजे आत्म करूणा आणि राग दोन्ही जाऊन समजूतदारपणा पर्यंत न्यायला नकळतपणे मला आर ई बी टी चा असा उपयोग होतोय तर....
योगेश फडतरे
ठाणे.
Comments
Post a Comment