गर्द पुस्तक
गर्द
अनिल अवचट यांचं मुक्तांगण मित्र आपल्या पैकी अनेकांना ऐकून माहित असतंच . पण त्याच्या जन्माआधी गर्दवरचा त्यांचा अभ्यास अनेकांना माहित नसेल. मुंबई पुण्यात त्याकाळी ब्राऊन शुगरचं व्यसन जोरात होतं. अनेक तरुणांना या व्यसनाच्या विळख्याने अडकवलं होतं. अगदी गरीब मुलांपासून मध्यमवर्गीय लोकांपर्यंत, आणि अगदी मंत्र्याच्या पोरांपर्यंत गर्दचं व्यसन करणारे लोक सापडत. हे व्यसन इतकं भयानक आहे कि दोनदा ते घेतलं की, माणसाला ते व्यसन लागलंच म्हणायचं . हे व्यसन सोडणं औषधोपचाशिवाय जवळ जवळ अशक्य असायचं. असल्या माणसांना के इ एम रुग्न्यालयात एक अवलिया डॉक्टर फार आस्थेने पाहायचा. अगदी त्यांच्या त्यांच्या विभागात जाऊन त्यांची चौकशी करायचा. त्या पोरांच्या संघटना उभ्या राहायच्या. आणि त्या तरुण डॉक्टरच्या सोबतीने गर्दसोबत लढायच्या. ओपीडी सोडून असे लोकांत जाऊन काम करणारे डॉक्टर फारच क्वचित सापडतात. विशेष म्हणजे ज्याचे पैसे मिळत नाहीत असे काम करायचे कशाला असला प्रश्न त्याला पडायचा नाही. हा तरुण डॉक्टर होता डॉक्टर आनंद नाडकर्णी ( #डॉआनंदनाडकर्णी) आणि त्याच्याकडे गर्दच्या व्यसनाचा अभ्यास करायला जाणारा पत्रकार डॉक्टर होता डॉ अनिल अवचट. पस्तीस वर्षांपूर्वी हे पुस्तक प्रसिद्ध झालं असावं तो काळ उदारीकरणाच्या आधीचा. त्याकाळी पैसे मिळत नसलेलं काम पण लोकं करत(?).
दारू सारख्या व्यसनाने माणूस उध्वस्त होतो हे ऐकले , पाहिले होते. त्यावर नाटकं आली ती प्रसिद्ध झाली. मी दारूच्या व्यसनात असलेल्या बापाच्या पोटी जन्म घेतला असल्याने मी अनुभवलंय की ते भयाण वास्तव काय असतं आणि समाज त्या माणसाचा कसा द्वेष करतो. अनेक लोक , विशेषतः नातेवाईक कसे टोमणे मारत ते आठवतंय, आजही ते क्षण नकोसे वाटतात.
पण गर्दचं व्यसन हे त्याहून( दारूहून ) कितीतरी भयंकर. गर्द पिणारा माणूस कधीही दुसऱ्या व्यक्तीला हेच सांगतो कि यात मी अडकलोय तसा तू अडकू नकोस. यात एकदा अडकलं की मग शेवट मृत्यूनेच. या असल्या रस्त्यावरच्या गर्दुल्ल्या लोकांना त्या मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढून पुन्हा सन्मार्गाला लावायचं काम हा तरुण डॉक्टर करत होता. माहीम , घाटकोपर, भांडुप अनेक ठिकाणच्या झोपडपट्ट्यांतून याची भाषणं व्हायची. एखादा तळमळीने त्यांना केम मध्ये या पोरांना घेऊन यायचा आणि हळू हळू गर्दुलली पोरं गर्द मधून बाहेर पडायला लागली.
गर्दच्या टर्की ईतकी तीव्र येत असे की, एखादा त्या रूगणलायत असा ओकत असे की त्याची उलटी जमीनीला समांतर जात असे. प्रचंड किळस आणि काटा आणणारं आहे हे सगळं. यांच्या वर एखाद्याला अभ्यास करावासा वाटतो हे आजच्या काळात पटणारं नाहीये. आज आपण व्यक्तिवादी झालोय.. इतके की नवरा बायको पण अगदी व्यवहाराने वागतात. मग या विषयाला पटलावर आणण्यासाठी कोणीतरी पुण्याहून तंगड्या तोड करून अभ्यास करायला खास येतो. ते पण या गर्दुल्ल्या पोरांसाठी. ज्यांना समाजाने ओवाळून टाकलंय .त्यांच्या विषयावर लिहायसाठी . कोणीतरी डॉक्टर त्या पोरांवर उपचार करत असतो हा प्रवास चकित करणारा आहे . ज्यांना सामाजिक जीवनात रस आहे . किमान भावना जिवंत आहेत त्यांनी हे पुस्तक वाचावे. पुस्तक जुने असल्याने मॅजेस्टिक मध्ये उपलब्ध नव्हते . योगा योगाने त्याची pdf उपलब्ध आहे नेट वर . फक्त माझ्याकडे मागू नका. साधारण पस्तीस वर्षांपूर्वी लिहिलेलं पुस्तक म्हणजे एका मनो सामाजिक आजाराचा मागोवा आहे .
व्यसनाच्या प्रश्नावर अधिक रस असणाऱ्यांनी हे पुस्तक जरूर वाचा.
योगेश फडतरे
ठाणे
#DrAnandNadkarni #dranilavchat
Comments
Post a Comment