ध्यानाचा उपयोग आणि मर्यादा
ध्यानाचा उपयोग आणि मर्यादा :-
विचार, भावना आणि वर्तन एकमेकांना फार संलग्न असतात. यातील विचार आणि भावना यांच्यावर आपले पूर्ण नियंत्रण नसते. वर्तनात मात्र बऱ्यापैकी बदल घडवता येतात. प्रत्येक वेळी घडवता येतातच असे नाही पण भावनेपेक्षा अधिक नियंत्रण वर्तनावर असते. वर्तन घडवण्यासाठी मूळ विचार आपल्याला करता येतो. मनातल्या मनात विचार वेगळ्या दिशेला नेणं हे मला अजून नीटसं जमलेलं नाही. पण वर्तनात बदल केल्यानंतर मात्र भावनांमध्ये बदल होतो हे मी अनेकदा अनुभवले आहे. वर्तनात बदल झाल्यावर मग विचारांची गाडी सुद्धा वेगळा टर्न घेते.
जसे की प्रचंड ताण आल्यानंतर जर ध्यान केले तर मानसिक तणाव निवळतो. मला ध्यानाबद्दल नेहमीच अविश्वास वाटत असे. परंतु मनातील काही ताकदीचे पैलू आता अलीकडे लक्षात येत आहेत. आणि त्याचे विज्ञानाच्या प्रगतीमुळे उत्तर सुद्धा सापडत आहे. अनेक बाबा लोक ध्यानाचे वर्ग हजारो रुपयांना भरवतात. तणावाची स्थिती होण्यासाठी तयार होणारे हॉर्मोन्स जसे की कॉर्टिसॉल यांचे प्रमाण ध्यानाने कमी होते. व त्यामुळे मनातील त्रासदायक भावना कमी होतात .परंतु बाबा लोक जसे की श्री श्री, सद्गुरु, सत्यसाई वगैरे लोक तुम्हाला हे कधीच सांगणार नाहीत. गंदा है पर धंदा है.असो.
ध्यानातील साक्षीभाव ध्यान म्हणजे माईंडफुलनेस हा सध्या मानसिक शांतता मिळवण्यासाठी फार प्रमाणात वापरला जातो. अनेक अमेरिकन विश्वविद्यालयांमध्ये साक्षीभाव ध्यानावर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. एम.आर.आय. वापरून नियमित ध्यान करणाऱ्या या व्यक्तींचे मेंदू तपासता येतात. नियमित ध्यान करणारे लोक तणावाच अधिक चांगला सामना करू शकतात, असे काही अभ्यासांमध्ये दिसून आले आहे.
परंतु एखाद्यास मुळातच नैराश्य, चिंता, बायपोलर, स्किझोफ्रेनिया सारखा आजार असेल आणि मेंदूतील जड पातळीवर मोठा केमिकल लोच्या असेल तर ध्यानाचा परिणाम तात्पुरत्या स्वरूपातच दिसतो. स्किझोफ्रेनिया सारख्या गंभीर आजारांमध्ये तर रुग्ण ध्यानाला बसण्याचा मनस्थितीतही नसतो.
परंतु सौम्य मानसिक आजारांमध्ये ध्यानाचा उपयोग होतो हेही नसे थोडके. एखादी वेळ मारून नेणे हे सुद्धा काही वेळेस खूप महत्त्वाचे ठरते. दारू पिण्याची प्रचंड तल्लफ येते पण ध्यानाच्या जोरावर तिला परतवून लावता येते, असे अनेक अनुभव आमचे रुग्ण सांगतात. अनेकदा तात्पुरता परिणाम करणारी पण मूळ आजारावर उपचार न करणारी औषधे खूप उपयोगाची असतात.
जसे की पॅरासिटमॉल हे औषध फक्त शरीराचे तापमान उतरवते आणि त्या वेळेचा उपयोग होतो व तुमचे शरीर स्वतहाच्या प्रतिकारशक्तीने जीवाणूंसोबत लढा देते. पॅरासिटॅमॉल ही तापाची गोळी तुम्हाला ते कठीण परिस्थितीतले चार दिवस पुढे ढकलण्यास मदत करते. ही गोळी स्वतः जीवाणूंसोबत लढायला उतरत नाही. तसेच उदाहरण दुखापत झाल्यावर वापरतो त्या आयब्युप्रोफेनचे देता येईल.
ध्यान साधारणतः या स्वरूपाचे आहे. ते तुम्हाला वेळ देते.( साधारणतः यासाठी म्हणते की गंभीर मानसिक आजारात साठी ध्यान निरुपयोगी आहे.)तुमच्या मेंदूत झालेला केमिकल लोच्या ठीक करण्याचे काम ध्यान करीत नाही. थोडेफार करतही असेल पण तसे सिद्ध तरी झालेले नाही. तुम्हाला जेव्हा वेळ आवश्यक असतो किंवा क्रायसिस मधून बाहेर यायचे असते तेव्हा ध्यान उपयुक्त ठरते( तणावाच्या प्रसंगात व अतिरिक्त चिंतेच्या प्रसंगात हे लागू होते भ्रम आणि भास अशी लक्षणे दाखवणाऱ्या गंभीर आजारांवर लागू होत नाही).
इथे लक्षात घ्यायला हवे ते असे की ध्यान हा काही मानसिक आजारावरचा खात्रीलायक उपाय नाही. पण म्हणून तो टाकाऊ देखील ठरत नाही.
सौम्य मानसिक आजार झालेला असेल आणि रोजच्या कामात व्यत्यय येत असेल तर अशांनी ध्यान करून मनाचा ताप अंगावर काढू नये, डॉक्टरकडे पळावे. कारण खूप आजारी नसताना डॉक्टरकडे गेलो म्हणून कोणाचा जीव गेल्याच्या घटना अजिबात घडत नाहीत. परंतु फार अंगावर काढले आणि फार उशिरा डॉक्टरकडे गेलो म्हणून मात्र नुकसान होते. प्रसंगी हे नुकसान मोठेदेखील होते.
म्हणून मित्रांनो, अगदी लहानशा ताणतणावासाठी तुम्हाला सायकॅट्रिस्ट कडे जावेसे वाटले तर बिनधास्त जा. समुपदेशन घ्यावेसे वाटले तर बिनधास्त घ्या.
पण असा एरर उलटा मात्र करू नका, अगदी अधिक आजारी पडल्यानंतर मगच डॉक्टरकडे जायचे हा जुनाट पूर्वीचा विचार आहे. तो सोडून द्यायला हवा, यात खरे शहाणपण आणि आपले हित सामावलेले आहे.
(टीप:- मला कोणत्याही ध्यानधारणा शिकवणाऱ्या संस्थेकडून अथवा सायकॅट्रिस्टकडून कोणतेही मानधन प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष मिळत नाही.)
Comments
Post a Comment