डिसथायमिक डिसऑर्डर
डिस्टथायमिया
ज्याबद्दल जास्त बोललं जात नाही पण तरीही गंभीर दखल घ्यावी असे नैराश्य अथवा औदासिन्य.
नैराश्य म्हंटले की आपल्याला वाटतं की ही अशी व्यक्ती असावी, जिला दिवसभराची कामे देखील पूर्ण करता येत नाहीत. सतत निराश वाटत राहते.जिच्या आयुष्यातला आनंद पूर्णपणे हरवलेला आहे. त्या व्यक्तीला रात्रीची झोप लागत नाही. ती व्यक्ती दिवसभर निराश असते घरी झोपून असते वगैरे वगैरे. पण वास्तवात नैराश्याचे काही प्रकार आहेत. त्यातला एक
डीसथायमिक डिसऑर्डर.
डीसथायमिक डिसऑर्डर हा नैराश्याचा असा प्रकार आहे की ज्यात रुग्ण असलेल्या व्यक्तीला कळत सुद्धा नाही की, आपण निराशेच्या गर्तेत अडकलो आहोत.आपल्याला उदास वाटतंय हे समजत असतं पण अनेक वर्षे तसं वाटतंय म्हणून ती सामान्य बाब असल्याचं वाटत राहतं.
काही लोकांना आयुष्यातल्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यात फारशी अडचण येत नाही किंवा अडचणी आल्या तरी ते त्यावर मात करतात. त्यामुळे तीव्र नैराश्य आलेल्या लोकांत जसे दिनक्रमावर परिणाम झालेलं आढळतं. तसं या व्यक्तींच्या आयुष्यातला दिनक्रम बिघडत नाही. पण आयुष्य ज्या सुंदर भावनेने जगायचं असतं, तो आनंद मात्र बऱ्याच प्रमाणात कमी झालेला असतो. अशा लोकांना असं वाटतच नाही की, मी नैराश्य किंवा औदासिन्य या आजाराने ग्रस्त आहे.
एक प्रातिनिधिक उदाहरण या बाबतीत पुरेसं बोलकं आहे.
एक मुलगी माझ्याकडे थेरपीसाठी येत होती. तेव्हा तिच्या बोलण्यातून जे समजले ते असे, की तिच्या वडिलांना आयुष्यात फारसा उत्साह वाटत नसे. पण ते कधी प्रचंड निराश दिसले नाहीत. बाहेर कुठे नातेवाईकांकडे जाण्यात त्यांना रस नसे. सगळ्यांनी कुठे फिरायला जावे म्हटले तर त्यांची नेहमी नकारघंटा असे. म्हणजे एका अर्थी ते उदास असत पण घोर निराशा त्यांना जाणवत नसे. मुलांना बाहेर फिरायला जाण्यासाठी त्यांनी कधी बंदी केली नाही. पण स्वतः मात्र आयुष्य एन्जॉय करण्यासाठी, सुट्टीच्या दिवसांमध्ये मजा करण्यासाठी ते बाहेर पडलेच नाहीत. त्यांचं हे असं असणं अनेक वर्षे असल्याने तिला आणि तिच्या वडिलांना ते सामान्य वाटत होते. वडिलांनी जे प्रेम द्यायला हवं होतं ते द्यायला ते कमी पडले अशी भावना तिच्यात होती.या मुलीच्या वडलांना असलेला आजार म्हणजे डीसथायमिक डिसऑर्डर. जो मानसोपचार घेतल्याने बरा होऊ शकतो.
असे अनेक लोक मला अनेक वेळा भेटतात जे अश्या प्रकारचे नैराश्य असल्याचे कबूल करतात. पण औषधे किंवा थेरपी साठी येणं त्यांना कलंकित वाटतं. उपचार घेतल्यानंतर मात्र त्यांची प्रतिक्रिया असते की, मी उगीच घाबरत होतो. उपचार घेतले हे फारच बरे झाले.आयुष्यातल्या आनंदाचा दर्जा प्रचंड प्रमाणात उंचावला.
मित्रानो उपचाराबद्दलचे गैरसमज टाळा, आणि उपचार करून घेऊन जीवनाचा पूर्ण आनंद लुटा.
योगेश विद्याधर फडतरे
मानसशास्त्रज्ञ
एम.ए.(चिकित्सा मानसशास्त्र)
संपर्क: 7738044044
Comments
Post a Comment