नवीन वर्षाचा संकल्प-हृदयविकारवर मात करण्यासाठी.
नवीन वर्षाचा संकल्प
मी आता नवीन वर्षात काही गोष्टी करण्याचा संकल्प केला आहे. हा संकल्प नवीन गोष्टी करण्याचा नाहीये. हा संकल्प जुन्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने करण्याचा आहे.
मी सकाळी किंवा सायंकाळी किमान अर्धा तास चालावयास जातो ही माझी खूप चांगली सवय आहे. परंतु हे सध्या मी रोज करत नाहीये. साधारणतः 60 टक्के वेळा मी चाललो असेल पुढील वर्षी हे चालणे मला अधिक वाढवायचंय. सध्या मी जेव्हा चालतो तेव्हा साधारण पाच हजार पावलांच्या आसपास चालतो. हे प्रमाण वाढवून मला साडेसहा हजार पावले इतके रोज करायचे आहे.
मी आतापर्यंत कधीच तंबाखू खाल्लेली नाही किंवा तंबाखूजन्य पदार्थ सुद्धा खाल्लेले नाहीत. कधीच बिडी-सिगरेट ओढलेली नाही. ही सवय मला कायम ठेवायची आहे. मी असा संकल्प करतोय की पुढील वर्षभरात सुद्धा मी कधीच बिडी सिगारेट ओढणार नाही किंवा तंबाखूसुद्धा खाणार नाही.
माझे वजन नॉर्मल या श्रेणीत आहे. पुढील वर्षात मी माझे वजन वाढू देणार नाही. फॅटी पदार्थ खाऊन, खूप जास्त तेलकट व गोड-धोड पदार्थ खाणे टाळेन. स्वतःचा बॉडी मेटाबोलिक इंडेक्स वाढू देणार नाही.
( ज्यांचे वजन खूप जास्त वगैरे असेल त्यांनी वजनावरून स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नये परंतु हृदयाच्या प्रकृतीसाठी मात्र वजन कमी करणे हा महत्त्वाचा भाग आहे.)
आहारात अधिकाधिक फळांचा समावेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या माझ्या आहारात फळांचा समावेश बर्यापैकी कमी आहे. तो वाढवणे माझ्या हिताचे असेल. म्हणून मी आहारात फळांचा समावेश करणार आहे. हिरव्या पालेभाज्या आम्ही घरी नेहमी खातो ते कायम ठेवणार आहे.
आता तुम्ही म्हणाल की हे सगळं लिहून सांगण्याची काय गरज आहे का ? तुझं तू कर की काय करायचं ते. तर उत्तर म्हणून सांगतो की वर दिलेल्या सगळ्या संकल्पांचा उपयोग हृदयविकारावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक पुस्तकामध्ये दिलेले आहेत. म्हणून हा लेखनप्रपंच.
थोडक्यात सांगायचं तर हृदयविकार हा संपूर्ण जगाला त्रास देणारा महत्त्वाचा आजार आहे याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं. आपल्या भारतातले सुद्धा 28 टक्के मृत्यू हृदयविकारामुळे होतात.
आरोग्यदायी जगणे जगायचे असेल तर,
1. रोज किमान तीस मिनिटे भरभर चालण्याचा व्यायाम करणे. असे आठवड्यातून किमान पाच वेळा तरी चालणे.
2. तंबाखूजन्य पदार्थांचा वापर कमी करणे, शक्यतो शून्यावर आणणे. तंबाखूजन्य पदार्थांचा वापर करत नसू, तर त्यासाठी स्वतःला व इतरांना शाबासकी देणे.
3. 35 पेक्षा अधिक वय असणाऱ्यांनी नियमितपणे रक्तदाब तपासणे. रक्तदाब 140/90 च्यावर असेल तर डॉक्टर कडे जाऊन ट्रीटमेंट सुरू करणे. ठराविक अंतराने रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी, ट्रायग्लिसराईडची पातळी इत्यादी तपासण्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करून घेणे.
4. आहारात फॅट्स आणि ट्रान्सफॅटी ऍसिडचे प्रमाण अत्यंत कमी ठेवणे.
5. वजन नियंत्रणात ठेवणे या काही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत या जागतिक आरोग्य संघटनेच्या
मार्गदर्शकेतून हाय क्वालिटी एव्हिडन्स असलेल्या 5 महत्त्वाच्या बाबी आहेत.
आता तुम्ही सगळेच काय 95 पानांचं पुस्तक वाचणार नाही. म्हणून हा लेख लिहिला.
(95 पानांचं पुस्तक मी स्वतः पण पूर्ण वाचलं नाही🤣)
खरंतर कॅलेंडर बदलतंय त्यात आपलं काहीच कर्तृत्व नाही. पण माणूस आहोत आणि माणूस प्राण्याला कंटाळ्याचा कंटाळा आहे, वर्ष बदलतंय तर करू सेलिब्रेट. म्हणून तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा.💐💐
तळटीप :- हे सर्व हाय क्वालिटीचे एव्हिडन्स आहेत. आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या पुस्तिकेतून घेतलेले आहेत. पण म्हणून हा लेख वाचला आणि डॉक्टरांकडे जाणे टाळले असे करू नका प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून हा लेख लिहिलेला आहे. अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांना भेट द्या.)
Yogesh Vidyadhar Phadtare
Psychologist
M.A. (Clinical Psychology)
Contact: 7738044044
Psychologist
M.A. (Clinical Psychology)
Contact: 7738044044
Comments
Post a Comment