छोटे छोटे चमत्कार.😊

छोटे छोटे चमत्कार

गीते सरांची रोज घोडदौड चालू होती. एखाद्या ठिकाणाहून फोन आला की गीते सर रस्त्यावरचा मनोरुग्ण पेशंट आणण्यासाठी जात असत.
माझे सरांच्या नवोदय व्यसनमुक्ती केंद्रातील समुपदेशनाचे काम चालू होते.एक दिवस संध्याकाळी गोठ्यासमोर सरांबरोबर गप्पा मारत बसलेलो असताना सरांना चासनळी या गावात एक निराधार मनोरुग्ण आढळल्याचा फोन आला. या गावातील तरुण या रुग्णाला अनेक दिवसांपासून पाहत होते.
त्यांनी गीते सरांना फोनवर आधी या रुग्णाची माहिती दिलेली होती. सरांनी लगेच तयारीला लागतो आणी आम्ही येतो असा निरोप कळवला. आणि पेशंटला उचलण्यासाठी  गीते सर, आमचे स्टाफ मधील दोन मित्र आणि मी असे चार जण  निघालो. 
गावाच्या बाहेर नदी वरुन जाणाऱ्या पुलाखाली हा इसम मळकट आणि घाणेरडे कपडे घालून बसला होता जे त्यानेच त्याच्या हाताने फाडलेले दिसत होते. वाढलेली दाढी आणि केस. अनेक दिवसांपासून, कदाचित महिन्यांपासून न केलेली अंघोळ यामुळे शरीराला प्रचंड दुर्गंधी येत होती. एकाच वेळी माझ्या मनात त्याच्याबद्दल करुणा आणि त्याच्या घाणेरड्या राहण्याबद्दल शिसारी या दोन्ही भावना येऊन गेल्या. 
सरांनी आणि आमच्या घुले काकांनी त्याला उचलले आणि गाडीत टाकले.फॉर्मॅलिटी पूर्ण करून आम्ही निघालो . गाडी चालवताना माझ्या लक्षात आले की हा मुलगा घाबरलेला होता आणि त्याच्या मनावर गंभीर परिणाम झालेला असल्याने, त्याच्या आयुष्यात आलेल्या स्किझोफ्रेनिया या भयानक आजाराने ग्रासलेला असल्यामुळे तो काहीच बोलू शकत नव्हता. घरकु घरकु हा एकच शब्द तो पुन्हा पुन्हा म्हणत होता. त्याच्या अस्तित्वाने गाडीमध्ये एक दुर्गंध पसरला होता ज्याची मला शिसारी येत होती.
आरशात त्याच्या चेहऱ्याकडे पाहून मात्र मनातल्या मनात रडावं की काय असं वाटत होतं.

जवळचे अंतर असल्याने काही वेळातच आम्ही सेंटरवर पोहोचलो. त्याला सेंटरवर आणल्यानंतर आमच्याकडील प्रथमेशने अशफाक ची पूर्ण दाढी कापली आणि केस कापले, तेव्हा आयुष्यात एखाद्या इसमास इतका प्रचंड कोंडा असू शकतो हे मी पहिल्यांदा पाहिले. त्याचे पूर्ण डोके कोंडामय झाले होते. इतक्यांदा हात फिरवेल तितक्यांदा त्याच्या टकला मधून कोंडा पडत होता. आणि हा भेदरलेला पोरगा त्याला आम्ही काहीतरी करू अथवा जंगलात नेऊन सोडून देऊ अशा एखाद्या भीतीने बावरला होता. त्याला डेटॉलच्या पाण्याने आंघोळ घातली आणि जेवण दिले. खूप भूक लागलेली असल्यामुळे हा पोरगा घपाघप जेवला. त्याच्या वर्तनाबद्दलची आणि राहणीमानाबद्दलची पूर्ण माहिती मानसोपचारतज्ञ डॉक्टर नीलेश मोहिते यांना कळवली व त्याचे औषध उपचार जाणून घेतले.
संस्थेचे व्यवस्थापक निलेश आयरे यांनी इतरांसोबत यालादेखील औषधे देण्यास सुरुवात केली. सुरुवातीस अश्फाक भास आणि भ्रम यांच्या दुनियेत राहत असे. आज साधारण महिन्याभरापूर्वी आलेला अश्फाक बोलायला लागलेला आहे. त्याची वास्तवाशी तुटलेली नाळ पुन्हा जुळते आहे.
त्याला स्वतःचे नाव, आई वडिलांचे नाव, घरी कोण कोण असते, त्याचे गाव कोठे आहे हे सगळे सांगता येत आहे.
झाडून काढण्याचे काम त्याला खूप आवडते. तो ते काम अत्यंत मन लावून करतो. अजूनही तो वास्तवाशी पूर्णपणे जुळलेला नाही.

 तो पूर्ण बरा व्हायचा अजून बाकी आहे.
औषधोपचारांनी अजून चांगला आणि मोठा फरक पडेल. हळूहळू अश्फाक स्वतःची कामे करू लागेल. रोजगारक्षम होईल व एक दिवस मोठ्या आनंदाने  त्याला त्याच्या घरी सोडून येऊ अशी आशा आहे. एखाद्याच्या आयुष्यात इतके बदल घडवू शकलो तरी आम्ही नवोदय परिवार समाधानी आहोत.


योगेश फडतरे
मानसशास्त्रज्ञ

Comments

Popular posts from this blog

मदतीचे सोपे नुस्खे

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

About me.