कमी वयातील दारूचा प्याला विषासमान
एकदा आमच्या व्यसन मुक्ती केंद्रामध्ये सहजच विषय निघाला की, दारू हे व्यसन लागलेल्या आमच्या मित्रांपैकी कोणी कोणी वय वर्ष पंधरा ते पंचवीस या काळामध्ये दारू चे पहिले सेवन केले. तर साधारणतः 90 टक्के लोकांनी हात वर केले. वय वर्ष 15 ते 20 मध्ये दारूचे पहिले सेवन करणाऱ्यांचे प्रमाण साधारण 65 टक्के होते. दारूच्या किंवा अन्य कोणत्याही व्यसनाने माणसाच्या शरीर किंवा मेंदूवर होणारे दुष्परिणाम नव्याने सांगण्याची गरज नाही. पौगंडावस्थेत मेंदू वेगाने वाढत असतो. त्यातील फ्रंटल कोर्टेक्सची वाढ तर वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत चालू असते. भावनांवर, वर्तनावर योग्य संस्कार करण्याचे हे वय असते. बदलणार्या शारीरिक संप्रेरकांमुळे पौगंडावस्थेतील वय वैशिष्ट्यपूर्ण असतेच. शिवाय मेंदूमध्ये विचार करणारा कोर्टेक्सचा भाग पूर्ण विकसित झालेला नसतो. या तरुणांच्या मानसिक विकासाच्या आड दारू आली तर हा विकास थांबून जातो व अपरिमीत नुकसान होते. त्यामुळे अशा वयात लागलेले व्यसन सुटता सुटत नाही.
प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या इंग्रजी म्हणी प्रमाणे आपण आपल्या समाजातील तरुणांना जर या वयातील व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगू शकलो आणि त्यासाठीची जनचळवळ उभारू शकलो तर तरुणांच्या आणि पर्यायाने आपल्या समाजात व्यसनाधीनतेचे प्रमाण प्रचंड कमी होईल.
आणि याचा एकुणात समाजाला फायदा होईल.
आरोग्याच्या क्षेत्रात काम करणार्या माणसांनी व्यसनाधीनतेसारखे आरोग्याचे गंभीर प्रश्न तयार होऊ नयेत यासाठी जर विशेष प्रयत्न केले. तर सुखी मानसिक आरोग्य मिळणे अधिक सुलभ जाईल यासाठी दारूचे व्यसन तरूणाई पासून दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न करायला हवे.
योगेश फडतरे
Comments
Post a Comment