सुरुवातीस दोन शब्द
मानसशास्त्र हा खरंतर गांभीर्याने करण्याचा उद्योग आहे. योग्य प्रशिक्षणानंतर त्यात आपले कौशल्य वापरून मानसोपचार करण्याची क्षमता हळूहळू विकसित होत जाते. पण समाजामध्ये अजून हा विषय खोलवर रुजायला अवकाश आहे. अनेक लोकांना मानसशास्त्र हा खूप सोपा विषय वाटतो. मानसशास्त्रज्ञ फक्त गप्पा मारत नाहीत तर ते तुमच्या सोबतच्या संवादातून तुमच्यावर उपचार करत असतात हे गांभीर्याने समजून घेणं गरजेचं आहे.
म्हणजे बघा हं, एखाद्याकडे पॅसेंजर कार आहे म्हणून तो शेतातून पेरणी करण्यासाठी पॅसेंजर कार फिरवत नाही तिथे ट्रॅक्टरच वापरावा लागतो. तसं मानसशास्त्रज्ञाकडे जाऊन केलेले मानसोपचार यांना पर्याय सामान्य माणसाशी गप्पा मारणं असू शकत नाही. त्यातून फार काही फायदा होत नाही. कारण तुम्हाला भेडसावणाऱ्या समस्यांची उकल सामान्य माणसाला तितक्या सफाईदारपणे करता येत नाही आणि अनेकदा गप्पा दिशाहीन होतात. मानसोपचारतज्ञाकडे जाणे हे निश्चितच समस्या निर्मुलनासाठी अधिक उपयुक्त ठरत असते. याची उदाहरणे आम्ही आमच्या व्यवसायात पावलापावलावर पाहत असतो. मानसिक समस्यांचे डी एस एम जवळपास पंधराशे वेगवेगळ्या आजारांचे पुस्तक मानसशास्त्रात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकवले जाते. व त्यावरील उपचारांची अनेक पुस्तके वाचून त्या ज्ञानाचा उपयोग करण्याची हातोटी आणि कौशल्य प्रयत्नपूर्वक मिळवावे लागते. तेव्हा मानसशास्त्रज्ञ ते ज्ञान घेण्यासाठी व कौशल्य मिळवण्यासाठी जी गुंतवणूक करतो त्या गुंतवणुकीचा परतावा त्याला मिळणे आवश्यक असते.
पण आपल्या समाजात अजूनही एखाद्याच्या ज्ञानाचा फायदा करून घेण्यासाठी किंमत मोजण्याची अनेकदा तयारी नसते.
समाजाने तशी खर्च करण्याची तयारी ठेवायला हवी. सायकोथेरपीमुळे व समुपदेशनामुळे वेगवेगळ्या वयोगटातील अनेक मानसिक समस्या ग्रस्त व्यक्तींना फायदा होतो आहे हे आम्ही आमच्या व्यावसायिक प्रॅक्टिसमध्ये पाहतो.
बदलत्या काळानुरूप लोकांमध्ये लोकांच्या गरजांमध्ये आणि मानसोपचार संबंधी त्यांच्या मनात असणाऱ्या कल्पनांमध्ये फरक पडत जाईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही.
Comments
Post a Comment