विचार बदला, नशीब बदलेल..
विचार बदला , नशीब बदलेल.. कुठल्याही रस्त्यावरच्या एखाद्या सेल्फ हेल्प प्रकारच्या पुस्तकात हमखास दिसणारं वाक्य आहे. पण हे वाक्य का खपतं याचा कधी खोलात जाऊन विचार केलाय का आपण ? कारण हे कॉमन सेन्स ला पटणारं आहे. आणि याला वास्तवाचं भक्कम पाठबळ आहे. विचार बदलले की नशीब बदलणार यात काही शंका नाही. पण प्रत्येकाला पूर्ण विचार बदलणं शक्य नाही इथे खरी गोची आहे. समुपदेशनामुळे आयुष्याला खूप सुंदर कलाटणी मिळालेले अनेक लोक आम्ही रोज पाहत असतो. काही लोकांना मात्र समुपदेशनापलीकडे औषध लागतं.
फ्रॉइड, स्कीनर, बेक, एलिस या सारख्या मानसोपचार-तज्ज्ञांनी विचारपूर्वक मांडलेल्या तंत्रांचे आज मानसशास्त्रद्न्य उपयोग करत असतात. यातल्या बेक प्रणित कॉग्निटिव्ह थेरपीचा गाभा हा आहे की विचार जसे कराल, तसे तुमचे आयुष्य बदलेल. यातून लहान लहान बदल होत असतात. कुठलाही चमत्कार होत नसतो. त्यामुळे सेल्फ हेल्प साठी वाचायचं असेल तर अल्बर्ट एलिस , आरॉन बेक किंवा एरीक बर्न वगैरे सारख्या मानसोपचार तज्ज्ञांची पुस्तके वाचा. रस्त्यावरच्या सेल्फ हेल्प पुस्तकामध्ये एक ठळक वैशिष्ट्य दिसून येते ते म्हणजे अर्धवट विज्ञान. काही तरी खूप सोपं करायला जाऊन त्यातल्या शास्त्राचा विचका करणं हे द सिक्रेट सारख्या अर्धविज्ञान वाद्यांचे वैशिष्ट्य आहे. अशी पुस्तके वाचून आपण जाम गंडत जातो. त्यामुळे मित्रहो स्वतःला मदत करण्यासाठी व्यावसायिक मदत घ्या.. म्हणजे माझ्यासारख्या मानसशास्त्रज्ञाची मदत घ्या. उगीच आपल्याला सगळं समजतं असा अट्टाहास करण्या पेक्षा आपल्याला काय समजत नाही हे समजणं अधिक महत्वाचं आहे.
योगेश फडतरे
मानसशास्त्रज्ञ
ठाणे
Comments
Post a Comment