सावध ऐका पुढल्या हाका... कोरोनाची तिसरी लाट...

आपल्याला जेव्हा पुढचे दिसत नाही तेव्हा ज्याला पुढचे दिसते त्याच्यावर विश्वास ठेवावा. हे मी असं म्हणतोय याचं कारण कोरोनावरचे एक्सपर्ट लोक असं सांगत आहेत की, महाराष्ट्रात विशेषतः शहरी भागात कोरोनाचे आकडे प्रचंड वेगाने वाढत आहेत. नवीन वर्षाच्या स्वागताचे कार्यक्रम लोकांनी रद्द करावेत यासाठी महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक ठिकाणांवर बंदी घातलेली आहे. संपूर्ण जगात कालच्या एका दिवसात सर्वाधिक कोरोना रुग्ण सापडण्याचा दुर्दैवी विक्रम झाला. अमेरिकेत 4 लाख चाळीस हजार तर, युरोपात 4 लाखाहून अधिक कोरोना रुग्ण एका दिवसात काल सापडले. शशांक जोशी हे टास्क फोर्स चे प्रमुख डॉक्टर असं सांगतात की ही तिसऱ्या लाटेची सुरुवात असण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सर्वांनी जबाबदारीने वर्तन करणे आवश्यक आहे.

अनेक लोक मास्कचा वापर करण्यास टाळाटाळ करतात.  मी ज्या ठिकाणी कामाला होतो तिथे कोरोनाबद्दलची गाफीलता मी जवळून अनुभवली होती. 
त्यात पुढे एका रुग्णाचा श्वसनाच्या आजाराने (कदाचित कोरोना ?)दुर्दैवी मृत्यू झाला. कमी भांडवलात, कमी मनुष्यबळात, प्रतिकूल परिस्थितीत काम करत असताना अशा गोष्टी होणे योग्य नसेल तरी क्षम्य आहे. परंतु  आपले अज्ञान हे अज्ञान आहे हे स्वीकारण्याची तयारी असायला हवी. मी पाहतो की अनेक सामान्य लोक अजूनही कोरोना वगैरे काही नसतं अशा अंधश्रद्धांना बळी पडतात. अनेक जण आपल्याला काही होणार नाही अशा संभ्रमात असतात.
दारुड्यांची किंवा रस्त्यावर राहणाऱ्या रुग्णांची किंवा अमुक एक प्रकारच्या लोकांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असते, असा एक गैरसमज अनेकांच्या मनात असतो. 
या असल्या अंधश्रद्धांना दूर फेकून दिले पाहिजे. 

चौतीस वर्षाचा नामांकित शरीरसौष्ठवपटू सुद्धा कोरोनाने मरण पावल्याचा इतिहास आहे. तेव्हा अमुक वयातील लोकांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली म्हणून त्यांनी मास्क घालण्याची गरज नाही, अशा भंपक युक्तिवादात अडकू नका. असलं काहीतरी लॉजिक काढून मी मास्क घालणार नाही, मी लस घेणार नाही अशी भंपकगिरी करू नका.  विज्ञान हे आपल्या मनानुसार, मतानुसार चालत नाही तर आपली मते आपल्याला विज्ञानास अनुकूल, विज्ञाननिष्ठ बनवावी लागतात. 

दुसऱ्या लाटेच्या काळात मी आमच्या सोसायटीच्या सेक्रेटरी यांना पत्र लिहून कळवले होते की, रंगपंचमीच्या आयोजनास परवानगी देऊ नये. त्यांनी माझा विनंतीकडे दुर्लक्ष करून आयोजनास परवानगी दिली. त्यानंतर त्या कार्यक्रमात असणाऱ्या अनेक स्त्रियांना कोरोनाची लागण झाली. त्यात एका 32 वर्षीय तरुण स्त्रीला जीव गमवावा लागला. हे अत्यंत दुर्दैवी होते. 

तेव्हा मित्रांनो, खासकरून मुंबई-पुण्यातील लोकांनी जे सघन वस्त्यांमध्ये राहतात, त्यांनी प्रचंड काळजी घ्यायला हवी. अगदी लॉकडाऊन काळासारखी काळजी आपण घ्यायला हवी.

शक्यतो गर्दीत जाणे टाळणे, मास्कचा नियमित वापर करणे, वारंवार साबण अथवा सॅनिटायजरचा वापर करून हात धुणे, मिळेल तेव्हा लशीचा बूस्टर डोस घेणे, इत्यादी काळजी घेत राहणे अत्यंत आवश्यक आहे.

(टीप :- मी स्वतः कोरोना झाल्याने नऊ दिवस रुग्णालयात दाखल होतो. यादरम्यान कोरोना आजाराची दाहकता पाहिली. जी वेळ माझ्यावर आली ती मित्र मंडळीवर येऊ नये ही इच्छा. म्हणून हा पोस्ट प्रपंच.)

Comments

Popular posts from this blog

मदतीचे सोपे नुस्खे

कॉग्निटिव्ह डीस्टॉरशन म्हणजे वैचारिक गफलती

About me.